पैशांच्या वादातून हातखंबा येथील घरात ज्योती ऊर्फ शमिका शिवदास पिलणकर या मैत्रिणीचा सुरीने भोसकून खून करणारा संतोष बबन सावंत या अपंग आरोपीला न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत त्याच्या पत्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार ती तिचा अपंग पती संतोष सावंतसह हातखंबा तारवेवाडी येथील संतोष रामचंद्र आंबवकर यांच्या घरात भाड्याने राहत होती. १० जानेवारी २०१९ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ती हातखंबा येथील सिद्धाई हॉटेलमध्ये कामाला गेली असताना संतोषची मैत्रीण ज्योती पिलणकर त्यांच्या घरी आली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संतोष आणि ज्योतीमध्ये पैशांच्या कारणातून वाद झाला. त्या रागातून संतोषने ज्योतीला कॉटवर पाडून पोटात सुरी भोसकुन तिला ठार मारले. आपल्या हातून गुन्हा घडल्याचे लक्षात येताच संतोष रिक्षाने त्याची पत्नी कामाला असलेल्या सिद्धाई हॉटेलजवळ गेला. पत्नीला घेउन घरी आला असता तिला ज्योती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली. त्यानंतर संतोषने घडलेली सर्व हकिकत तिला सांगितल्यावर तिने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ज्योती पिलणकरच्या मृतदेहाचा पंचनामा करून संतोष सावंत विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड.प्रफुल्ल सावळी यांनी २२ साक्षघदार तपासत परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानण्यात आला. आरोपीला संतोष सावंतला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी दोषी ठरवून आजन्म जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड तो न भरल्यास १ वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.