दिल्ली आणि NCR परिसराला शनिवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी होती. रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी हे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्र बिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश येथे होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही. ५.८ तीव्रतेचा भूकंप हा मध्यम तीव्रतेचा मानला जातो.
भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदुकुश असल्याने यांचे झटके जम्मू-काश्मीरमध्ये देखील जाणवले. तसेच पाकिस्तान आणि उत्तर भारतात या ठिकाणी हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीर आणि दिल्ली परिसराला अधून मधून भूकंपाचे सौम्य धक्के बसत असतात.
जम्मू-काश्मीरला गेल्याच महिन्यातील १७ तारखेला भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचा केंद्रबिंदू कटरा येथे होता. रात्री १० वाजून ७ मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी नोंदवण्यात आली होती. त्याआधी १४ जून रोजी किश्तवाड येथे ३.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला होता.त्याच दिवशी १८ तासाने दुारी २ वाजता आणि १३ जून रोजी म्हणजे मंगळवारी दुपारी १.३० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. ३० एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी ४.१ तीव्रतेचा धक्का बसला होता.
दिल्लीला धोका
दिल्लीला मोठ्या भूकंपाचा झटका बसू शकतो अशी शक्यता गेल्या काही वर्षापासून व्यक्त केली जात आहे. दिल्ली भूकंपाच्या झोनमधील चौथ्या झोनमध्ये येते. दिल्ली हिमालयाच्या जवळ आहे आणि भारत आणि युरेशिया या टेक्टॉनिक प्लेट एकत्र आल्याने त्याची निर्मिती झाली होती. या भागात काही हलचाली झाल्या तर त्याचा पहिला धक्का दिल्ली, कानपूर आणि लखनौ या भागाला बसतो.