Meta च्या मालकीचे मेसेजिंग अॅप WhatsApp मध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या यूजर इंटरफेस आणि टॉप अॅप बारमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन डिझाइन रिलीझ केल्यानंतर, वरील पट्टी ही पांढर्या रंगात दिसणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान असं झाल्यास WhatsApp चा चेहरा-मोहराच बदलणार असं म्हटलं जात आहे. याशिवाय संपूर्ण अॅपचा इंटरफेस हिरवा असेल. नवीन डिझाइनची चाचणी Android बीटा आवृत्ती 2.23.18.18 वर केली जात आहे, जरी ती सध्या सर्व बीटा परीक्षकांना दिसत नाही. व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट आणि अपकमिंग फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या साइटने ही माहिती दिली आहे.
नवीन अपडेट्ससाठी, व्हॉट्सअॅपचं बीटा व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. नवीन डिझाइनचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे. नवीन डिझाईन अपडेट कधी रिलीज होईल याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा अपडेट सामन्यांना कधी वापरायला मिळणार हे सांगतिले जाऊ शकत नाही.
विशेष म्हणजे मागील काही काळापासून व्हॉट्सअॅप हे आपल्या अॅपमध्ये नवनवीन बदल आणत नवीन फीचर्सही आणत आहे. अलीकडेच WhatsApp ने HD व्हिडिओ आणि HD फोटो पाठवण्याची सुविधा जारी केली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर एचडी फोटो पाठवू शकता आणि 720 पिक्सेल म्हणजेच एचडी व्हिडिओही पाठवू शकणार आहात.