कधी टोमॅटो तर कधी कोथिंबीर पिकातून लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचा बातम्या क्वचित ऐकायला मिळतात.मात्र शेती उत्पादन घेताना नुकसान अनेकदा नुकसान होत असते.गेल्या काही दिवसांपूर्वी तेजीत असलेली कोथिंबीरची जुडी लासलगाव बाजार समितीत अवघ्या ५१ पैशाला पुकारल्याने शेतकऱ्याने या जुड्या विकण्यापेक्षा फेकून देण्यात समाधान मानले.
मध्यंतरी कोथिंबिरीला चांगले भाव मिळाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली होती.म्हणून आपल्याला पण चांगले पैसे होतील या हेतूने चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर आहेर यांनी आपल्या शेत जमिनीत मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची लागवड केली. मात्र कमी पावसाचा परिणाम म्हणून उशिराने कोथिंबीर शेतात तयार झाली.
लासलगाव बाजार समितीत भाजीपाला लिलावामध्ये त्यांनी ट्रॅक्टर मधून आपली कोथंबीर विक्रीसाठी आणली होती.सध्या मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक असल्याने त्यांच्या कोथिंबीरीला ५१ पैसे प्रति असा भाव व्यापाऱ्यांकडून करण्यात आला. ५०० जोडी त्यांनी विक्रीसाठी आणली होती. मात्र पुकारलेल्या भावात त्यांना संपूर्ण कोथिंबीर विक्रीतून २५५ रुपये मिळाले असते. या पैशापेक्षा बाजार समितीमध्ये ट्रॅक्टर आणण्यासाठी जास्त रुपयाचे डिझेल त्यांना लागल्याने त्यांनी कोथिंबीर विकण्यापेक्षा फेकून देण्यामध्ये समाधान मानले. कोथंबीर शेतातून काढण्यासाठी ३०० रुपयांची मजुरी लागल्याचे ते हताशपणे सांगत होते.
शेतकऱ्याने वैतागून कोथिंबीरला भाव नसल्याने बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर ओतून देत ती जनावरांपुढे टाकली. आता उरलेले कोथिंबीर पून्हा विक्रीला आणून वाहतुकीसाठी खर्च करायचा नाही. काढणीसाठी मजुरी वाया जाऊ द्यायची नाही असा पवित्र त्यांनी घेतलेला असून गेल्यावेळी कांद्यात नुकसान सोसावे लागले. आता कोथिंबीर मध्ये पुन्हा तीच परिस्थिती अशा स्थितीत शेतकऱ्याने नेमके उत्पादन घ्यायचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महिनाभरापूर्वी कोथिंबीर होती २२ रुपये जुडी
लासलगाव बाजार समितीत कोथिंबीर जोडीला केवळ ५१ पैसे इतका मातीमोल बाजारभाव मिळाला. गेल्या जुलै महिन्यात याच ४ तारखेला कोथिंबीरची जुडी २२ रुपये याप्रमाणे विक्री गेली होती. त्यावेळी आवक मात्र फक्त ४१० जुडी इतकी होती. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक वाढत चालल्याने अत्यंत कमी दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.