लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसला रेल्वे बोगी नामकरणावरून तोंडघशी पडल्याबद्दल त्यांचे लातूर शहर भाजपाने हार्दिक अभिनंदन केले आहे. रेल्वे बोगी प्रकल्प हा देशात इतरत्र उभारण्यात येत होता. तो प्रकल्प भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील पदाधिकार्याच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रातही हा प्रकल्प कोठे उभारावा यासाठी अनेक शहरात जागेची पाहणी केली.
मराठवाड्यात यासाठी अनेक ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु लातूर जिल्ह्यातील लोकनेते विलासराव देशमुख यांचा महात्वाकांक्षी नियोजित टेंभी येथील प्रकल्प प्रलंबित राहिल्याने या जागी हा रेल्वे बोगी प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्य द्यावे. यासाठी लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने महाराष्ट्र पातळीवर आणि केंद्रीय पातळीवरील पदाधिकार्यांना साकडे घातले. परंतु तांत्रिक अडचणी,बाजारपेठ, वाहतुकीसाठी मध्यवर्ती ठिकाण ठरणार्या हरंगुळ शिवारातील जागेची निवड करून हा प्रकल्प उभा केला. तो प्रकल्प आता काही महिन्यांमध्ये लोकार्पीत केले जाणार आहे. मात्र लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या रेल्वे बोगी प्रकल्पाला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी हास्यास्पद असून या निमित्ताने विक्रांत गोजमगुंडे आणि काँग्रेस दोघेही तोंडघशी पडले आहेत.
मुख्यत: विलासराव देशमुख यांच्या कार्याबद्दल लातूरकरांची आणि भाजपाचे कोणतेही दुमत नाही. त्यामुळेच त्यांचे नाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला देण्यात आले. मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यालाही देण्यात आले. शहरातील जुन्या रेल्वे मार्गालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर अन्य ठिकाणीही त्यांचे नाव देण्याला आमचा विरोध नाही. परंतु रेल्वे बोगी प्रकल्प हा संपूर्णपणे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प उभारला गेला आहे. हे करत असताना भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या कोणत्या एका नेत्याचे नाव देण्याची मागणी सुरुवातीपासून झाली नाही. हा प्रकल्प देश पातळीवर विभागानुसार ओळखला जावा. आणि मराठवाड्याचा एक मोठा प्रकल्प आपल्या लातूर शहरांमध्ये उभारल्यास लातूरचे नावही जागतिक पातळीवर जावे. यासाठी मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्प असे नाव देण्यात आले.
संपूर्ण प्रकल्प उभारणी होईपर्यंत लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे शांत राहिले. प्रकल्प उभारणी होऊन लोकार्पण होण्याच्या वेळेसच त्यांनी नागरिकांची, लातूरकरांची, काँग्रेस पक्षाची, दिशाभूल करून आपण काँग्रेस आणि देशमुख कुटुंबीयांशी कसे एकनिष्ठ आहोत. हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. त्यांचा हा हेतू काँग्रेसच्या, पदाधिकार्यांसह अनेकांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांची ही मागणी हास्यास्पद असल्याचे मत लातूर शहर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी व्यक्त केले आहे. जर त्यांची ही मागणी किंवा त्यांच्या मताशी काँग्रेस सहमत असेल तर त्यांचे काँग्रेसने जाहीर अभिनंदन करावे. शहरातील मुख्य रस्त्यावर त्यांच्या अभिनंदनचे बोर्ड लावावेत. अशी मागणी गुरुनाथ मागे यांनी केली आहे. परंतु विक्रांत गोजमगुंडे यांच्या या रेल्वे बोगी प्रकल्पाच्या नामकरण मागणी, आणि वक्तव्यावरून काँग्रेस पुन्हा एकदा बॅक फुटवर गेल्याचे दिसून येत आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.