सहा राज्यांमधील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तीन जागा राखल्या. उर्वरित चार जागांमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि तृणमूल काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. उत्तर प्रदेशातील घोसी येथील लक्षवेधी लढतीत समाजवादी पक्षाने (सप) आपली जागा कायम राखली.
त्रिपुरातील दोन आणि उत्तराखंड, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील प्रत्येकी एक विधानसभा जागेसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. स्थानिक आमदारांचे निधन आणि दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने तेथे पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या.
उत्तराखंडमधील बागेश्वर; तसेच त्रिपुरातील धनपूर आणि बॉक्सानगर अशा तीन ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आले. त्रिपुरामध्ये काँग्रेस आणि तिपरा मोटा पक्ष यांच्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) हातमिळवणी केली होती. मात्र, त्याचा कोणताच फायदा या पक्षाला होऊ शकला नाही. पश्चिम बंगालमधील धुपगिरी येथे तृणमूल काँग्रेसने भाजपसह काँग्रेस-माकप आघाडीला नमवले. झारखंडमध्ये सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन (आजसू) या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. केरळमधील पुथूप्पल्ली येथील जागा सत्ताधारी ‘माकप’ला काँग्रेसकडून हिसकावून घेणे शक्य होऊ शकले नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री उम्मन चंडी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली होती. तेथे काँग्रेसने चंडी यांचे पुत्र अॅड. चंडी ओमन यांना उमेदवारी दिली होती.