औरंगाबाद: सोंगी भारूड, भजनी भारूड, कूट भारूड यासह देशभक्तीपर पोवाडे आणि देवीच्या गोंधळांच्या सादरीकरणाने लोकरंगांची बहारदार उधळण पूर्वरंग कार्यक्रमात करण्यात आली. औरंगाबाद जिल्हा प्रशासन व वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समितीच्यावतीने यंदा बहुप्रतिक्षित वेरुळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव-2023 चे येत्या 25 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या ‘पूर्वरंग’ मध्ये आज, 15 फेब्रुवारी रोजी भारूड, पोवाडा, गोंधळ आदी लोककलांचे रंग उधळले गेले. झाशी राणी पुतळा, क्रांती चौक येथे आयोजत या कार्यक्रमाचे उदघाटन साहित्यिक आणि कवी प्रा. फ. मु. शिंदे , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक, डॉ. श्रीमंत हारकर, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सहायक संचालक विजय जाधव यांच्या हस्ते झाले.
सुरवातीला भारुडांचे सदरीकरण झाले. गाडगे महाराजांच्या ग्रामसुराज्य, स्वछतामी, देशभक्ती आणि जनजागृतीचा भारूडांमध्ये समावेश होता. संतांनी जगाला भारुडातून पर्यावरण रक्षण, कुटुंबाचीमूल्ये शिकवल्याचे शेखर भाकरे यांनी हे भारूड सादर करताना सांगितले. गोंधळाचे सादरीकरण शाहीर सुमित धुमाळ यांनी केले. संत तुकाराम महाराज, भानुदास महाराज, एकनाथ महाराज यांनी लोकजागृतीपर लिहलेल्या गोंधळाचे उर्जावान सदरीकरण यावेळी झाले. जी -२० साठी औरंगाबादचे वर्णन करणारा गोंधळ आकर्षण ठरला. ‘अजिंक्य लिंगायत यानीं एका पेक्षा एक पोवाडे सादर केले.
प्रारंभी झांशी राणी पुतळ्याला पुष्प हार घालून तसेच दीप प्रज्वलन करून लोक कलांचा जागर सुरू झाला. यावेळी दीपक हरणे ( प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी) , तसेच आयोजन समिती सदस्य अनिल इरावणे, डॉ. ऋषिकेश कांबळे, कुंडलिक अतकरे, आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन प्रा. दीपक खिस्ती यांनी केले.
वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव – 2023 चा औरंगाबाद शहरवासी तसेच शहरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे जिल्हा प्रशासन तसेच पर्यटन संचालनालयाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.