दीनदयाळ पतसंस्थेचे सभासद विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. अभय आगरकर हे पतसंस्थेचे पहिल्या संचालक मंडळातील संचालक आहेत. भाजपच्या नगर शहराच्या अध्यक्षपदी त्यांची दुसऱ्यांदा निवड होणे आनंदायी आहे. त्यांच्या दांडग्या अनुभवामुळे भाजपाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहराचा आमदार भाजपाचाच झाला पाहिजे. बाहेरून आलेल्या इतरांच्या पालख्या आम्ही उचलणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने भाजपाच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची निवड झाल्याबद्दल, तसेच जैन ओसवाल पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष गांधी व व्हाईस चेअरमनपदी समीर बोरा यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचा एकत्रित सत्कार करण्यात आला. यावेळी दीनदयाळ पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, सचिव विकास पाथरकर, संचालक निलेश लोढा व बाबासाहेब साठे आदींसह पतसंस्थेचे सभासद व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना अभय आगरकर म्हणाले, दीनदयाळ पतसंस्थेचे सर्वांनी मिळून लावलेले छोटे रोपटे आता मोठे वटव्रुक्ष झाले आहे. पतसंस्थेचे काम उत्कृष्टपणे चालू असल्याने संस्थेची प्रतिमा उजळलेली आहे. सर्वसामान्यांना आधार असलेल्या या पतसंस्थेचे रुपांतर बँकेत व्हावे. भाजपाने माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त करत दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल.
दिलीप भालसिंग म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा व जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचे पूर्वीपासून मला मार्गदर्शन होत आहे. पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी मला दिली आहे. सर्वांना बरोबर घेत ही जबाबदारी निभावणार आहे.
यावेळी संतोष गांधी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निलेश लोढा यांनी केले. पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे यांनी आभार मानले. यावेळी माजी व्हाईस चेअरमन गौतम दीक्षित, उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर, बाळासाहेब खताडे, सुहास पाथरकर, मुकुंद वाळके, बाळासाहेब भुजबळ, दादा बोठे, नाथा देवतरसे आदींसह पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.