बॉलिवूड किंग खान शाहरुखचे भारतासह विदेशातही अनेक चाहते आहेत. शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला जवान सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो आहे. शाहरुखचा जवान सिनेमा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी त्याच्या चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. आता शाहरुखचा एक मोठा चाहता समोर आला असून तो गंभीररित्या आजारी असूनही जवान सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचला आहे.
शाहरुखचा हा चाहता व्हेंटिलेटवर आहे. अशा परिस्थितीत तो सिनेमा पाहण्यासाठी आला आहे. या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित गुप्ता नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लयूएंसरने या चाहत्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शाहरुखचा हा चाहता व्हेंटिलेटरवर असूनही सिनेमागृहात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या चाहत्याने सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाचं, दिग्दर्शकाचं आणि शाहरुखच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक केलं आहे.
अनीस फारुकी असं या शाहरुखच्या चाहत्याचं नाव आहे. अनीस गंभीररित्या आजारी असूनही तो सुपरस्टारचा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचला होता.
७ सप्टेंबर रोजी जवान सिनेमा प्रदर्शित झाला. शाहरुखच्या जवान सिनेमाने केवळ सात दिवसांत ३५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर जगभरात सिनेमाने जवळपास ७०० कोटींचा गल्ला जमवला आहे. चाहत्यांमध्ये शाहरुखच्या या सिनेमाची मोठी क्रेझ आहे.
एटली कुमार दिग्दर्शिक, मल्टीस्टारर ‘जवान’मध्ये शाहरुखसोबत नयनतारा, दीपिका पादुकोण, मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर, प्रियामणी, रिद्धी डोगरा, सान्या मल्होत्रा अशी तगडी स्टारकास्ट आहे. सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आठवडा उलटला असला, तरी सिनेमाची, शाहरुखची क्रेझ कायम आहे.
या सिनेमाबाबत बोलताना दिग्दर्शक एटलीने, कोविड काळात झूम कॉलर या सिनेमाची गोष्ट सर्वांना ऐकवली होती. लॉकडाउनपासून या सिनेमावर काम सुरू करण्यात आलं होतं. आता आमचा सिनेमा सुपरहिट झाल्याचा अतिशय आनंद असल्याचं तो म्हणाला. एटलीने आतापर्यंत केवळ पाच सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून त्याचे सर्व सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.