काही दिवसांवर देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन येऊन ठेपला आहे. मात्र आजही ग्रामदिन भागातील देशवासीयांच्या संघर्ष पाचवीलाच पुजल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांवर आजही पायाभूत सुविधांची वाणवा आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा अनेर अभयारण्यातील अति दुर्गम भागांत वसलेले गाव व अनेक आदिवासी पाडे अजूनही प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे.
आजही महाराष्ट्रातील अनेक वाड्या वस्त्यांवर धड रस्ते नाहीत ना आरोग्याच्या सुविधा, त्यामुळे त्यामुळे इथल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी आजही कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. नेहमीच खाचखळग्यांची वाट तुडवत पोटापाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या आदिवासीं समाजापर्यंत विकासाची गंगा अद्याप पोहोचलेली नाही. शिरपूर तालुक्यातील अनेक या पाड्यांकडे जाण्यासाठी धड रस्ते नाहीत, शिक्षणाची सोय नाही, उपलब्ध शाळांची पडझड झालेली आहे. वीज आणि पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. मूलभूत प्रश्नांचीही सोडवणूक न झाल्याने या पाड्यांवरच्या आदिवासींना विकास म्हणजे काय असतो हेच अजून उमगलेले नाही. शिरपूर पासून काही अंतरावर असलेल्या वाड्या वस्त्यांवरील शाळा आजही कुडाच्या झोपडीत भरत असल्याचे वास्तव आहे. जवळपास चौदा अशाप्रकारच्या शाळा असून प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
शिरपूर पासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर हे आदिवासी पाडे आहेत. वन्यजीवांच्या नावाखाली विविध शासकीय योजनांना तिलांजली देऊन येथे शाबूत मनुष्य प्राण्याला न्याय मिळत नाही. सोहज्यापाडा, चिंचपाणीपाडा, भिवखेडापाडा, तेल्यादेवपाडा, सातपाणीपाडा, जमाईपाडा, कांज्यापाडा, जामनपाणीपाडा, जुनापाणीपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये विकासाची गंगाच अद्याप पोहोचलेली नाही. या आदिवासी पाड्यांमध्ये जायचे असेल तर रस्त्याचीच सोय नाही. आहे ते रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असून या मार्गावरून वाहन चालवणे, हे मोठ्याच जिकिरीचे काम आहे. मात्र रोजगार दूर, पाणी, वीज, रस्ते या मुलभूत प्रश्नांकडेही लक्ष देण्यात आले नाही.
या उलट परिस्थिती अनेर अभयारण्य या क्षेत्रात असून नागरिकांचा अधिवास असल्याने त्यांना नेहमीच गाव सोडून दुसरीकडे स्थलांतराची भीती मनात बसलेली असते. वीज, पाणी, रस्ते अभयारण्याच्या नावाखाली सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाही. तरी आरोग्य, शिक्षणाच्या नावाने बोंब सुरूच असल्याचे दिसत आहे. सोहज्यापाडा, चिंचपाणीपाडा, भिवखेडापाडा, तेल्यादेवपाडा, सातपाणीपाडा, जमाईपाडा, कांज्यापाडा, जामनपाणीपाडा, जुनापाणीपाडा अशा दुर्गम आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढतच असून रखरखीत उन्हाचे चटके सोसत काही पाड्यावर पाण्यासाठीची वणवण सुरूच असल्याची भीषण परिस्थिती पाहायला मिळते.
सर्व शिक्षा अभियानाच काय झालं?
दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी पाड्यात शिक्षणाची गंगा पोहचून या समाजाचा विकास व्हावा, या हेतूने सरकारकडून जवळपास 17 वर्षांपूर्वी सर्व शिक्षा अभियान ही संकल्पना राबवली. तिला कृतीत उतरवण्यासाठी सरकारकडून आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली होती. पण शालोपयोगी वस्तूंसाठी सरकारकडून पुरवण्यात आलेला हा निधी आदिवासींच्या शिक्षासाठी किती खर्च झाला, असा प्रश्न शिरपूर तालुक्यातील आदिवासी पाड्यात नजर फिरवताच पडतो. सर्व शिक्षण अभियानानुसार शालेय बांधकाम, शौचालये, पाठ्यपुस्तके इत्यादी गोष्टींवर लक्ष पुरवले जाते. मात्र तालुक्यातील बहुतांश शाळांच्या दुरवस्था झाली आहे. गळके छप्पर, डागडुजी अभावी ढासळत चाललेल्या शाळेच्या भिंती, विजेची सोय नसल्याने शाळांतील खोल्यांत पसरलेला अंधार यांमुळे आदिवासींच्या जीवनात शिक्षणाचा दिवा लावून त्यांना प्रकाशवाटांकडे घेऊन जाणाऱ्या या अभियानाचे काय झाले, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.