सालगडी राहतो म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला सदर बझार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन माळी यांनी पुण्यातून अटक केली. महादेव राकडे (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.जिल्ह्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतकऱ्यांना मजुरी परवडत नाही, वेळेवर मजूरही मिळत नाहीत.
कामाच्या व्यापात अनेकांना शेतीकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सालगड्याच्या शोधात आहेत. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून महादेव रोकडे याने मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील चार शेतकऱ्यांना जवळपास दीड ते दोन लाखांचा गंडा घातला आहे.त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक व सदर बझार पोलिस ठाण्यात तीन असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.
त्याने आपली ४२ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद उमेश वामन आवताडे (रा. विरवडे बु., ता. मोहोळ) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे करीत आहेत. तर राजसिंग विठ्ठल जाधव (रा. कुमठे तांडा, ता. उत्तर सोलापूर) यांची ३६ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचीही फिर्याद सदर बझार पोलिसांत दाखल आहे.