श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा एकत्रित योग आला आहे. या निमित्ताने राज्यभरातील सर्वच लहान-मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर (पुणे), त्र्यंबकेश्वर (नाशिक), औंढा नागनाथ (हिंगोली), घृष्णेश्वर मंदिर (छत्रपती संभाजीनगर) येथील मंदिरे श्रावणी सोमवार निमित्ताने आकर्षक पद्धतीने सजली होती. महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांचा अलोट उत्साह आणि पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करून भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या सोबतच देशभरातील अन्य प्रमुख मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
भीमाशंकरला महाराष्ट्राच केदारनाथ देखील म्हटले जातं. छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर श्रावणी सोमवारच्या निमित्तानं सजून गेलंय. बारा ज्योतीर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर आहे. पहाटेपासूनच भाविक बेल-फुलं वाहून, तसेच दुग्धाभिषेक करून शिवशंकराचं दर्शन घेताना पाहायला मिळाले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग म्हणजे हिंगोलीतील औंढा नागनाथ. पहाटेपासून या मंदिरात भाविकांची रिघ सुरू आहे. मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आले. हेमाडपंथी असलेल्या या नागनाथ मंदिरात भाविकांची कायम रिघ असते.
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने महादेवाच्या मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. या मंदिरात विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने अन्नछत्र देखील राबवले जातं. बीडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने भाविकांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतूनही भाविक येत असतात. त्यांना दर्शन घेणं सुलभ व्हावे, यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवर लोखंडी बॅरिकेट्स उभारण्यात आले होते.
सर्वच प्रमुख मंदिर परिसरात प्रशासनाच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या. तर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची करडी नजर ठेवली जात होती. मंदिर परिसर बम बम भोले, हर हर महादेव आदी जयघोषांनी दुमदुमून गेला होता.
याशिवाय काशी विश्वनाथ मंदिर (वाराणसी), सोमनाथ मंदिर (गुजरात), अमरनाथ मंदिर (जम्मू-काश्मीर), मल्लिकार्जुन मंदिर (आंध्र प्रदेश), रामनाथस्वामी मंदिर (तामिळनाडू), केदारनाथ मंदिर (उत्तराखंड), महाकालेश्वर मंदिर (मध्य प्रदेश), लिंगराज मंदिर (ओडिशा), नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर (गुजरात), वैद्यनाथ मंदिर (झारखंड), कोटिलिंगेश्वर मंदिर (कर्नाटक) आदी देशभरातील प्रमुख शिवमंदिरांमध्येही दर्शनासाठी भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला.