चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कामातगुडा परिसरात तेलंगणा राज्यातील भूगर्भ वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. या भागात बेसाल्ट खडक आढळून आले आहेत. सहा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भीय उलथापालतीमुळे या खडकाची निर्मिती झाल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे. जीवती तालुक्यात दोन ठिकाणी बेसाल्ट खडक आढळले आहेत. सात कोटी वर्षांपूर्वी खोल समुद्राचा हा भाग होता. म्हणूनच इथे चूनखडक आणि शेल खडक आढळतात. ६.५ कोटी वर्षादरम्यान इथे लाव्हारस वाहात येऊन बेसाल्ट खडक बनले. त्यांतील काही भागात हे कोलमणार बेसाल्ट तयार झाला.
साडेसहा कोटी वर्षांदरम्यान पश्चिम महाराष्ट्राकडून लाव्हा वाहत आला त्यातूनच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात बेसाल्ट खडकांची निर्मिती झाली.
परंतु ज्या ज्या ठिकाणी हा वाहता बेसाल्ट पाण्याच्या संपर्कात आला किंवा अचानक थंड झाला तिथे तिथे त्याचं कोनीय खांबात रूपांतर झालं. अनेक ठिकाणी असे खांब आढळतात. तेव्हा लोक त्यांना ऐतिहासिक मंदिराचे खडक समजतात, असं अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं. जिल्ह्यातील जिवती येथे आढळलेले कोलमनार बेसाल्ट हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात. मुंबई, जळगाव, कोल्हपूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर परिसरात हे खडक आढळतात. माणिकगड पहाडावर तीन ठिकाणी सहा कोटी वर्षांदरम्यानची जिवाष्मं आढळली होती.