पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना देशसेवा करता यावी यासाठी स्थापन केलेल्या अग्निवीर आर्मीमध्ये भरती होण्यासाठी पेण तालुक्यातील तरुण गेला होता. तब्बल सहा महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करत त्याने कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पहिला अग्निवीर होण्याच्या मान मिळवला आहे. प्रज्वल टावरी असे या तरुणाचे नाव आहे. प्रज्वल पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र आहे.
आर्मीमधील सहा महिन्यांचे ट्रेनिंग पुर्ण करुन प्रज्वल आपल्या जन्मगावी म्हणेजच पेणमधील रावे गावात आल्यानंतर गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. फटाक्यांच्या
आतिषबाजीने आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात गावकऱ्यांकडून प्रज्वलचं स्वागत करण्यात आलं. रावे गावातील मनिषा आणि पद्माकर टावरी या दाम्पत्याचा सुपुत्र प्रज्वल अत्यंत गरीब कुटुंबात वाढला. मात्र, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर प्रज्वलने अग्निवीर आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं आणि पूर्णही केलं.
स्वागतावेळी बोलताना प्रज्वल याने आपले आई-वडील, काका रामभाऊ टावरी तसेच श्री रायबादेवीच्या आशीर्वादाने यशस्वीपणे सैन्यात भरती झाल्याचे सांगितले . प्रज्वलने आर्मीचे सहा महिन्यांचे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पुर्ण केले आणि आता तो युवकांचे आदर्श बनला आहे. आपला ट्रेनिंग कार्यकाळ संपवून प्रज्वल टावरी प्रथमच आपल्या रावे या जन्मगावी आल्याने गावात त्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते.
अबालवृद्धांनी भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय शिवराय अशा घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशाच्या गजरात प्रज्वलची मिरवणूक काढली. सुवासिनी महिलांनी प्रज्वलवर फुलांची उधळण करत ओवाळणी केली. यावेळी रावे गाव कमिटीचे अध्यक्ष राजा पाटील, गावचे पोलीस पाटील रामभाऊ टावरी, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर तसेच गावकरी, प्रज्वलचे पालक यांच्यासह प्रज्वलने जागृत देवी श्री रायबादेवीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.