माजलगाव उजव्या कालव्यावरील चारीचे उगमस्थान ईंजेगांव जवळील गेटवरून होत असून चारी चा शेवट सोनपेठ तालुक्यातील शिर्शी गावामध्ये होतो. या चारीवर इंजेगाव, धारडीगोळ, निमगाव, खपाट पिंपरी,गवळी पिंपरी, सोनखेड, दहिखेड, शेळगाव यासह शिर्शी बुद्रुक या गावांच्या बहुतांश शेतीच्या सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे.
परंतु मागील अनेक वर्षापासून या सारीची दुरुस्ती गुलदस्त्यातच राहिली आहे. या चारीचे काम संबंधित खात्याकडून प्रत्येक वर्षी थातूरमातूर पद्धतीने केल्या जाते व पूर्ण कामाचे बिलं उचलून घेतले जातात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित चारीमध्ये काटेरी झुडपासह मोठ्या प्रमाणात वेड्या बाभळी उगवलेल्या आहेत.
अनेक ठिकाणी चारीच्या काँक्रेटवर झुडपे उगवल्याने काँक्रेट फुटून नासधूस झाली आहे तर काही ठिकाणी या झुडपांना पाठाचे पाणी तुंबून गाल्यांना भेगा पडल्या आहेत. चारीमध्ये मोठ्या प्रमाणात दगड व मातीचा गाळ साचलेला आहे.
गेली महिन्याभरापूर्वी या चारीतील गाळ काढण्याचे काम थातुर माथूर पद्धतीने करण्यात आले असून हे काम गुत्तेदारामार्फत होत आहे की संबंधित खात्यामार्फत? या कामाचे इस्टिमेट किती व संबंधित यंत्रणेने बिलं उचलले किती? ही माहिती अद्याप गुलदस्त्यातच असून याबाबतीत वरिष्ठांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.