सोलापूर-बार्शी रस्त्यावरील बाळे टोल नाक्यापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, या रस्त्याची कोणतीही देखभाल दुरुस्ती केली जात नाही. मात्र, या रस्त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून टोल वसुली सुरू आहे. अवघ्या दीड किलोमीटरमध्ये तब्बल ११ ठिकाणी गतिरोधक आहेत.
बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर-बार्शी या मार्गाचे डांबरीकरण झाले आहे. मात्र, हे डांबरीकरण टोल नाक्यापर्यंतच झालेले आहे. टोल नाका ते बाळे पूल या दरम्यानचा रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. वीस वर्षांपूर्वी झालेल्या रस्तेबांधणीसाठी अजूनही टोल वसुली सुरू आहे. मात्र, या टोल वसुलीतून या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक असताना, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.