भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील आई प्रतिष्ठान व पुल्ली कन्या प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने एक हजार पणत्या प्रज्वलित करून भारताच्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत हा कार्यक्रम विणकर बागेत झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, मुख्याध्यापिका गीता सादूल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षिका जाहिदा जमादार यांची उपस्थिती होती.यावेळी पणतीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यावर विद्यार्थिनींनी पणत्या लावून भारताच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भव्य तिरंगा हाती घेऊन विद्यार्थिनींनी भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष केला.पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे म्हणाल्या, आपल्या देशाचा सन्मान ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे परमकर्तव्य आहे.