शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर सध्या काय वाटत असेल, ईडी आणि आयटीचा दूत म्हणून परिचित असलेले माजी खासदार किरीट सोमय्या यांना सध्या काय वाटत असेल?, राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना राज्यस्तरीय नेत्यांना सध्या काय वाटत असेल, हा जसा प्रश्न उत्सुकता निर्माण करतो, तसाच प्रश्न जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात निर्माण झाला आहे.
मोहोळ, माढा, माळशिरस आणि करमाळा या मतदार संघातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक सत्तेच्या सावलीत गुण्यागोविंदाने सध्या तरी व्यवस्थित नांदताना दिसत आहेत. या नेत्यांमधील आजपर्यंतची दुश्मनी संपली की त्यांना सत्तेचा गोडवा सारं काही सहन करण्यास भाग पाडू लागला आहे, याचे कोडे सामान्यांना पडले आहे. भाजपसाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याने तूर्तास खासदारकीला हातात हात आणि आमदारकीला पायात पाय, अशीच रणनीती दिसत आहे.