सोलापूरकरांना प्रसिद्ध हम्पी आणि हॉस्पेट या कर्नाटकातील प्रेक्षणीय स्थळांना वारंवार भेट देण्याची सोय झाली आहे. मुंबई-गदग सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि सोलापूर -गदग डेमू रेल्वेगाडी आता गदगपासून पुढे हॉस्पेटपर्यंत धावणार आहे. असा प्रस्ताव वर्षभरापूर्वी दक्षिण आणि मध्य रेल्वे सोलापूर विभागाने दिला होता. त्यास रेल्वे मंडळाने नुकतीच मंजुरी दिली.
दक्षिण रेल्वे विभागाने प्रेक्षणीय स्थळाला भेट देणाऱ्या प्रवाशांचा विचार करून हा प्रस्ताव पाठवला होता. त्यास सोलापूर विभागानेही दुजोरा दिला होता.सोलापूर- गदग ही पॅसेंजरप्रमाणे सर्व स्थानकांवर थांबणारी गाडी आहे. ती सकाळी ११.५० वाजता येथून निघून रात्री ८.५५ वाजता गदग येथे पोहोचते. तर मुंबई गदग ही पहाटे ५ वाजता सोलापुरात पोहोचून ५.१५ मिनिटास गदगकडे रवाना होते. ती रात्री ११.५५ वाजता गदगला पोहचते आहे. पुढच्या थांब्याच्या नव्या वेळा निश्चित केल्या जाणार आहेत.