जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील गोंधळ काही केल्या संपत नाही. तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी पदभार सोडल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्यामार्गे हा पदभार महिला व बालकल्याणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यावर येऊन थांबला आहे. प्राथमिकचा विषय मार्गी लागल्यानंतर आता माध्यमिक शिक्षण विभागामध्ये रजासत्र सुरू झाले आहे.
शिक्षणाधिकारी फडके यांनी ‘लाँग लिव्ह’ तर उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी ‘शॉर्ट लिव्ह’ मागितली आहे. या अधिकाऱ्यांच्या रजा मागणीवर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी काहीच निर्णय दिला नसल्याचे समजते. १ ऑगस्ट २०२३ रोजी मारुती फडके हे माध्यमिक शिक्षण विभागाचे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. रुजू होताच त्यांच्या खांद्यावर प्राथमिकच्या प्रभारीची जबाबदारी पडली. शालार्थ आयडी नसल्याने वेतन मिळत नसल्याने सोलापुरातील अनुदानित शाळेतील शिपायाने आत्महत्या केली. तेव्हापासून ते शालार्थ आयडी देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यापर्यंतच्या घडामोडीत माध्यमिक शिक्षण विभाग आघाडीवर राहिला आहे.