सोलापूर, 13 ऑगस्ट, ( हिं.स) कुरणवाडी (आष्टी) ता. मोहोळ येथील शेतकरी कुटुंबातील रहिवाशी व सध्या भिगवण पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दिलीप गोविंद पवार यांना त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन ”ग्रीन वर्ल्ड क्लब” या संस्थेतर्फे दिला जाणारा ”ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया 2023” हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे मोहोळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कुरणवाडी येथील शेतकरी गोविंद पवार यांचे ते सुपुत्र आहेत. चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या यादीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी आपल्या सकारात्मक कामाचा ठसा उमटविला. त्यांनी रस्त्यावर होणाऱ्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करून त्याला आळा बसवला.वाहतूक कोंडी, रस्ते अपघात कमी करण्याचाही पवार यांनी प्रयत्न केला. सर्वसामान्यांना कायद्याचा बडगा न दाखविता त्यांची अडचण जाणुन घेऊन, त्यांनी अनेक अडचणीच्या समस्यांचा निपटारा केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे जनमानसात पोलिसांवरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.