तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या उपस्थतीमध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस)ची येत्या २४ एप्रिल रोजी शहरांतील आमखास मैदानावर सायंकाळीं ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. असल्याची माहिती खासदार बी. बी. पाटील, आमदार जीवन रेड्डी, आमदार शकिल आमीर यांनी रविवारी ( दि. १६) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या सभेत विविध राजकीय पक्षांमधील प्रमुख नेतेमंडळी बीआरएसमध्ये प्रवेश करणार असून याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केसीआर यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. नांदेड जिल्ह्यात त्यांनी आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहे. तर तिसरी सभा आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात होत आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना श्री. रेड्डी म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी आम्ही तेलंगणामध्ये अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. नुसत्या घोषणा केल्या नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आमचे शेतकरी मॉडेल देशात यशस्वी ठरले. चार लाख कोटी खर्च करुन गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल यादृष्टीने नियोजन केले. ६२ लाख शेतकऱ्यांना ८० हजार कोटींची आर्थिक मदत दिली. २४ तास वीजपुरवठा केला जातो. देशपातळीवर पण फक्त आश्वासने दिली जातात. त्यांचे गुजरात मॉडेल फसवे, गोलमाल आहे. महाराष्ट्रातही असेच चित्र आहे असा टोला त्यांनी यावेळी मोदी सरकारला लगावला. आम्ही शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले. प्रत्येक मतदारसंघात पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी केली आहे. आयटी क्षेत्रात अव्वल आहोत. आम्ही सर्वांच्या हितासाठी काम करतो. महाराष्ट्र सरकारकडे मोठी आर्थिक तरतूद असूनही शेतकऱ्यांसाठी फार काही केले जात नाही. शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल. महाराष्ट्रात जर तेलंगणासारख्या योजना राबविल्या तर आम्हाला इकडे येण्याची गरजच नाही. पण ‘अबकी बार किसान सरकार’ हे ब्रीद घेऊन आम्ही महाराष्ट्रात व देशभरात जात आहोत. यावेळी महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांमधील नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत,” असा दावा त्यांनी केला. याप्रसंगी बीआरएसचे हैद्राबादच्या जहिराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार बी.बी. पाटील, अरमुर विधानसभाचे आमदार जीवन रेड्डी आणि बोधन विधानसभाचे आमदार शकील आमिर, प्रदेशाध्यक्ष माणिक कदम, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, कदिर मौलाना, अभय पाटील चिकटगावकर, प्रा. प्रदीप सोळुंके, प्रविण जेठेवाड आदींची उपस्थिती होती.