पंढरपूर – चौदा वर्षा पासून यमाई तलावा नजिक असणाऱ्या नगरपरिषदेच्या जागेवर बुध्द विहार उभारण्याची आमची मागणी आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करून, नगरपरिषदेने ठराव करून देखील आम्हाला न्याय मिळाला नाही. तर दुसरीकडे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना मात्र तातडीने घर बांधणीसाठी जागा देण्यात येणार असल्याची माहिती असून प्रशासनाच्या या कारभारा विरोधात दि.20 मार्च रोजी अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा बुध्द विहार कृती समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
याबाबत माहिती देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुध्दभूमी निर्माण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यास आप्पासाहेब जाधव, प्रशांत लोंढे, रवींद्र शेवडे, स्वप्नील गायकवाड, अमित कसबे, महेश मोटे, योगेश जाधव, अमर फडतरे, दीपक साबळे, रूपशे वाघमारे आदी उपस्थित होते.
येथील यमाई तलावा नजिक पंढरपूर नगरपरिषदेची दहा एकर जागा असून या जागेवर बुध्द विहार उभारणीची मागणी 2012 सालापासून विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदर जागा देण्या विषयीचा ठराव देखील नगरपरिषदेने केला आहे. या ठिकाणी बोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पन्नास कोटी रूपये देण्याची घोषणा देखील केली आहे. 2015 साली सदर जागेची मोजणी करण्यात आली होती. तरीही अद्याप त्याचा नकाशा तयार करण्यात आला नाही. आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत दोनवेळा या विषयी प्रश्न उपस्थित केला होता. तरीही अधिकारी या विषयी दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. सदर जागा देण्याबाबत गेल्या चौदा वर्षा पासून टोलवाटोलवी केली जात असल्याचा अनुभव आम्हाला येत असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली.
तर दुसरीकडे 2024 साली श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी सदर जागा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आमच्या बाबतीत उदासिनता तर मंदिर समितीच्या बाबत अधिकाऱ्यांनी ऐवढी तत्परता का दाखवली असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. सदर जागा बुध्द विहारासाठीच राखीव ठेवावी, मंदिर समिती कर्मचारी अथवा इतर कोणास राहण्यास देण्याचा आमचा कडाडून विरोध असून यासाठी दि.20 मार्च रोजी तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा सिध्दार्थ जाधव यांनी दिला.
























