‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तब्बल १७ लाख हिंदू कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडले आणि ते परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या मागण्या पूर्ण करता येत नाही, त्यामुळे त्यांना धमकावलं जातं होतं, त्यातूनच त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ बार्शीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आंबेडकर यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. आंबेडकर म्हणाले, ‘एक अत्यंत महत्त्वाची माहिती केंद्र सरकारने दडवली आहे आणि काँग्रेसवाले त्यावर बोलायला तयार नाहीत. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देण्यात आले आहे. एकंदरित १७ लाख कुटुंबे परदेशी स्थायिक झाली. त्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी ५० कोटी रुपयांची होती. हे आकडे माझे नाहीत. राज्यसभेच्या वेबसाइटवर तुम्हाला हे आकडे मिळतील’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘त्यांच्यापैकी काहींना विचारले, की तुम्ही देश सोडून बाहेर का जात आहात. ते म्हणत होते, की त्यांनी जी पन्नास कोटींची मालमत्ता कमावली आहे, ती त्यांच्या बापजाद्यांनी मेहनत करून मिळविलेली आहे. त्यांच्याकडे मागण्या केल्या जातात. त्या मागण्या त्यांना पूर्ण करता येत नाहीत; म्हणून त्यांना धमकावले जात आहे. बापजाद्यांनी कमावलेली इज्जत मातीत मिळविण्यापेक्षा आपण भारत सोडून परदेशी जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.’ असा दावाही आंबेडकरांनी केला.
‘नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला यासाठीच तुम्ही सत्तेमध्ये बसवले होते का, की १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडून जावे. मला विचारलं जातं की १९५० पासून २०१४ पर्यंत किती लोकं देशाबाहेर गेले, तर फक्त सात हजार गेले,’ असेही आंबेडकर म्हणाले.