अक्कलकोट – तालुक्यातील तडवळ आणि रुद्देवाडी येथील ओंकार साखर कारखाना कडून यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रती टन तीन हजार रु. दर जाहीर करण्यात आल्याची माहिती जनरल मॅनेजर व्ही एम गायकवाड यांनी दिली.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शन खाली व्यवस्थापनाने गळीत हंगाम २०२५-२६ साठी गाळपास येणाऱ्या ऊसाचा दर निश्चित केलेला आहे.यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडून प्रती टनास तीन हजार दर जाहीर करण्यात आले असून त्यापैकी पहिला हप्ता २ हजार ९०० रु.प्रमाणे अदा केला जाईल. दुसरा हप्ता रुपये १०० प्रमाणे दिपावलीमध्ये अदा करण्यात येईल.१ मार्च २०२६ पासून गळीतास येणाऱ्या ऊसाला अधिकचे १०० रुपये असे एकूण ३ हजार १०० रु. दर देण्यात येणार आहे.१ एप्रील २०२६ पासून गळीतास येणाऱ्या ऊसाला अधिकचे २०० रुपये असे एकुण ३ हजार २०० रुपये दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतलेला आहे.
मागील वर्षाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सिझन २०२५-२६ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाच्या टनेजनूसार कारखाना धोरणाप्रमाणे दिपावली सणामध्ये मोफत साखर वाटप करण्यात येणार आहे.कारखान्यास ऊस पुरवठादार शेतकरी यांचे सहकार्य आणि विश्वास नेहमीच कारखान्या सोबत राहिला आहे. यापुढेही आपला कारखाना आपल्या हितासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास तत्पर राहील असे विश्वास जनरल मॅनेजर व्ही एम गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
ओंकार ग्रुपने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ साध्य केली आहे. या प्रमाणे अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील मातोश्री साखर कारखाना आता ओंकार ग्रुपचे वतीने चालू गळीत हंगमात सुरु केले आहे.सध्या अक्कलकोट तालुक्यात ओंकार ग्रुप वतीने तडवळ आणि रुद्देवाडी या दोन्ही ठिकाणी गळीत हंगाम सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस द्यावी.पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बिल अदा करण्यात येणार आहे.
– चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील, ओंकार ग्रुप
















