बार्शी – महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरेच्या पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या “माझी वसुंधरा अभियान ५.० (२०२४- २०२५)” च्या स्पर्धेत बार्शी नगरपरिषद्, जि. सोलापूर, यांनी अमृत गटामध्ये (१ लक्ष ते ३ लक्ष लोकसंख्या) राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करीत तब्बल चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. शनिवार (दि.२१) दुपारी मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम बोरीवली येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे व विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्या हस्ते हा गौरव सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष सौ.तेजस्विनी कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, नगरसेवक विजयनाना राऊत, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, माजी नगरसेवक प्रशांत कथले, स्वच्छ भारत अभियानाचे शहर समन्वयक गणेश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नागरिकांमध्ये पर्यावरण जनजागृती अशा विविध घटकांमध्ये बार्शी नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी करीत राज्यात मानाचे स्थान पटकावले असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. या यशामागे तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांचे नियोजनबद्ध काम महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.


























