सोलापूर : सोलापूर शहराच्या भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १०२ जागांसाठी गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.
एकूण ५६४ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. शहरातील ९ लाख २४ हजार ७०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभागानुसार तीन व चार मते राहणार असून मतदान यंत्रावरील मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे राहणार आहेत. शुक्रवारी दि. १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
सोलापूर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे , निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या माध्यमातून या निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील 26 प्रभागांमध्ये 102 जागांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी 353 इमारतींमध्ये एकूण 1,091 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या निवडणुकीत शहरातील 9 लाख 24 हजार 706 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यंदा प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. ‘अ’ जागेसाठी पांढरा, ‘ब’ जागेसाठी फिका गुलाबी, ‘क’ जागेसाठी फिका पिवळा तर ‘ड’ जागेसाठी फिका निळा रंग असणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना रंगांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक १ ते २४ मधील मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या जागेसाठी बटन दाबल्यानंतर उमेदवाराच्या नावासमोरील लाल दिवा लागेल, मात्र बीप आवाज येणार नाही. चौथ्या व शेवटच्या जागेसाठी मतदान केल्यानंतर दीर्घ बीप आवाज येईल. याच बीप आवाजानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजावे.
प्रभाग क्रमांक २५ व २६ साठी तीन मते द्यायची असून पहिल्या दोन जागांसाठी बीप आवाज येणार नाही, तर तिसऱ्या व अंतिम मतानंतर दीर्घ बीप ऐकू येईल. तसेच कोणताही उमेदवार पसंत नसल्यास प्रत्येक जागेसाठी ‘नोटा’ (None of the Above) पर्याय उपलब्ध आहे.
मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहणार आहे. यंदा ‘एक मत’ नव्हे तर प्रभागानुसार तीन किंवा चार मते द्यायची आहेत.
मतदान केंद्रांच्या संख्येच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वाधिक 21 मतदान केंद्रे असून, त्याखालोखाल प्रभाग क्रमांक 9 मध्ये 18 मतदान केंद्रे आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 8, 13, 22 आणि 24 या प्रभागांमध्येही तुलनेने अधिक मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. याउलट प्रभाग क्रमांक 1 आणि 25 मध्ये सर्वात कमी, प्रत्येकी 9 मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून, प्रभाग क्रमांक 2, 11 आणि 26 मध्येही मतदान केंद्रांची संख्या मर्यादित आहे.
3494 बॅलेट युनिट्स, 1365 कंट्रोल युनिट्स उपलब्ध
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाने ईव्हीएम व साहित्याची व्यापक तयारी केली आहे. यामध्ये 3 हजार 494 बॅलेट युनिट्स आणि 1 हजार 365 कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले असून, मतदान केंद्रांच्या गरजेनुसार 1 हजार 250 स्टेशनरी किट्स तसेच 2 हजार 500 बॅलेट युनिट कव्हर कंपार्टमेंट्सचा वापर करण्यात येत आहेत.
मतपत्रिकांचे रंग असे :
– अ जागा : पांढरा
– ब जागा : फिका गुलाबी
– क जागा : फिका पिवळा
– ड जागा : फिका निळा
* प्रभाग क्रमांक 1 ते 24 :
– एकूण 4 मते द्यायची
– पहिली, दुसरी, तिसरी जागा : लाल लाईट, बीप नाही
– चौथी (शेवटची) जागा : दीर्घ बीप आवाज
* प्रभाग क्रमांक 25 व 26 :
– एकूण 3 मते द्यायची
– पहिली व दुसरी जागा : लाल लाईट, बीप नाही
– तिसरी (शेवटची) जागा : दीर्घ बीप आवाज
* दीर्घ बीप आवाज म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण
किमान २ ते ४ बॅलेट युनिटचा उपयोग
प्रत्येक मतदान यंत्रास एक कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट असे दोन भाग असतील. हे दोन भाग एकमेकांस जोडल्यानंतर हे मतदान यंत्र कार्यरत होते. एका बॅलेट युनिटवर १५ उमेदवारांसाठी मतदान करण्याची तरतूद आहे. एकास एक असे ४ बॅलेट युनिट जोडून ६० उमेदवारांच्या निवडणुकीचे मतदान घेता येते. दरम्यान, सोलापूर महापालिकेसाठी उमेदवारांच्या आवश्यक संख्येनुसार बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. विविध प्रभागात किमान २ ते ४ बॅलेट युनिटचा उपयोग करण्यात येणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर इतके राहणार कर्मचारी
प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन पोलिंग ऑफिसर, एक शिपाई व एक पोलीस कर्मचारी असा कर्मचारी वर्ग राहणार आहे. प्रत्येक कर्मचारी आपापली जबाबदारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडणार आहे.
प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे
२६ ‘आदर्श मतदान केंद्रे’ सज्ज
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.
२६ ‘आदर्श मतदान केंद्रे’ सज्ज राहणार आहेत. महापालिका हद्दीतील प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे एकूण २६ मतदान केंद्रे ‘आदर्श मतदान केंद्र’ म्हणून विकसित केली जाणार असून यामध्ये पर्यावरणपूरक हरित मतदान केंद्रे व महिला मतदान केंद्रांचा समावेश आहे. ऑरनेट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून “मतदारांची शपथ” हा उपक्रम शहरातील विविध भागांत राबविण्यात आला. याअंतर्गत एकूण ७० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मतदानात सोलापूरकरांनी १०० टक्के
सहभाग नोंदवावा : डॉ. ओम्बासे
सोलापूर महा निवडणुक मतदानासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नेटके नियोजन करण्यात आले आहे.मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. या सर्व नियोजनामुळे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततापूर्ण, निर्भय व यशस्वीरीत्या पार पडेल. गुरुवारी दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या मतदानात सोलापूरकरांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
४६ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था दृष्टीने ४६ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने ७ निवडणूक निर्णय अधिकारी निहाय ७ ठिकाणी ईव्हीएम मशीनचे वितरण, स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निप्रतिबंधक व्यवस्था व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
एकूण २,७४१ पोलीस राहणार तैनात
कायदा व सुव्यवस्था व सुरक्षिततेसाठी एकूण २ हजार ७४१ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यामध्ये १५१ पोलीस अधिकारी, १६८० पोलीस हवालदार,
तसेच एसआरपीएफ च्या २ कंपन्या यांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

















