बीड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड जिल्हा अॅम्युचर खो-खो संघटनेच्या आयोजनाखाली बीड येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या ६१ व्या पुरुष–महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशीही थरार कायम राहिला. पुरुष व महिला गटात रायगड, अहिल्यानगर, रत्नागिरी, परभणी व बीड संघांनी आपली आगेकूच सुरू ठेवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष गट : परभणी, बीड, रायगड, रत्नागिरीची दमदार कामगिरी
पुरुषांच्या सामन्यात यजमान बीडने जळगाववर ३२-२२ असा १० गुणांनी विजय मिळवला. बीडकडून अभिजित हिवाळे (३.३० मि. संरक्षण), अभिषेक हिवाळे (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), शुभम बहिर (१.३० मि. संरक्षण व १२ गुण), तुकाराम कारंडे (१.३०, ३.१० मि. संरक्षण) तर पराभूतजळगावकडून संजय पवार (२, २.१० मि. संरक्षण) आणि मोहित महाले (१२ गुण) यांनी चमकदार खेळ केला.
परभणीने हिंगोलीवर ३१-८ असा एका डाव राखून २३ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. परभणीकडून अभय कोंडगीर (२.२० मि. संरक्षण व २ गुण) आणि अर्जुन काळे (२ मि. संरक्षण व २ गुण), ओमकार बारहाते (८ गुण) तर पराभूत हिंगोलीच्या ओमकार भोसले व कृष्णा यांनी निर्णायक योगदान दिले.
नंदुरबारने सिंधुदुर्गचा ३७-२२ असा १५ गुणांनी पराभव केला. नंदुरबारकडून कैलास पाटील (२.३०, नाबाद ३.२० मि. संरक्षण), सचिन गोसावी (२.२० मि. संरक्षण ६ गुण), रोहित गावित (२, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) तर सिंधुदुर्गकडून रॉड्रीग क्रिस्टन (२.५५ मि. संरक्षण व २ गुण), महादेव, सिद्धेश व भूषण (प्रत्येकी ४ गुण) यांनी जोरदर लढत दिली.
रत्नागिरीने लातूरचा ३१-१४ असा एक डाव राखून १७ गुणांनी विजय मिळवला. रत्नागिरीकडून सार्थक कदम (४.२० मि. संरक्षण), ओम पवार (२.१० मि. संरक्षण व ८ गुण), अजय पवार (६ गुण) यांनी चांगला खेळ केला.
पुरुष गट इतर निकाल
मुंबई उपनगरने नंदुरबारवर एक डाव राखून ४९-१६ असा विजय मिळवला. बलाढ्य सांगली कडून जळगाव ४८- १६ असा १डाव ३२ गुणांनी पराभूत झाला. रायगडने छत्रपती संभाजीनगरवर २८-१२ अशी बाजी मारली. मुंबईने परभणीवर २९-२२ असा १ डाव राखून ७ गुणांनी पराभव केला.
महिला गट :
महिला सामन्यात रत्नागिरीने नंदुरबारवर ५०- ६ असा १ डाव राखून ४४ गुणांनी विजय संपादन केला. रत्नागिरकडून साक्षी लिंगायत (३.१० मी. संरक्षण), तेजल पवार (२.५० मी. संरक्षण), वैष्णवी फुटक (८ गुण) तर पराभूत नंदुरबारकडून नेहा वसावे (१ मी. संरक्षण) यांनी जोरदार खेळ करत वाहवा मिळवली.
मुंबई उपनगर मुंबई वि (महिला गट)
मुंबई उपनगरने मुंबईवर ३०-२६ असा निसटता ४ गुणांनी विजय मिळवला. उपनगरच्या साक्षी वाफेलकर (२.३०, नाबाद २.१० मि. संरक्षण ४ गुण), साक्षी पारसेकर (१.३० मी. संरक्षण व 6 गुण) सिद्धी हिंदळेकर (२ मी. संरक्षण व ४ गुण) तर पराभूत मुंबईच्या खुशबू सुतार (१.०५ मी. संरक्षण व १२ गुण), सेजल यादव (२.२८, नाबाद १.२० मि. संरक्षण), इशाली आंब्रे (२.२० मी. संरक्षण व ४ गुण) यांनी धमाकेदार खेळ करत शेवटपर्यंत प्रेक्षकंना खिळवून ठेवले.
इतर निकाल :
ठाण्याने धुळ्याचा ४२-१४असा १ डाव २८ गुणांनी विजयी मिळवला. सोलापूरने अहिल्यानगरवर ३४- १४ असा १ डाव २० गुणाने विजय मिळवला. धाराशिवने लातूरवर ३४- १० असा एक डाव राखून २४ गुणांनी विजय मिळवला. धाराशिवने रत्नागिरीवर ५७ – १६ असा विजय मिळवला.
उपउपांत्य फेरीची तयारी; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
साखळी सामन्यांनंतर विजयी संघ उपउपांत्य फेरीत दाखल झाले असून, बाद फेरीत विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. बीडच्या क्रीडारसिकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, प्रकाशझोतातील सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे उद्घाटनप्रसंगी साडेचौदा हजारांहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवली गेली, त्यामुळे बीडचे क्रीडावातावरण अक्षरशः भारावून गेले आहे.


























