उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन लाख 65 हजार शेतकऱ्यांनी सन 2021 मधील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या नुकसानी पोटी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील पिकांची संरक्षित रक्कम म्हणून 748 कोटी 69 लाख रुपये पिक विमा मिळणे अपेक्षित असताना बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीने फक्त 374 कोटी 34 लाख इतकी रक्कम पीक विमा नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना अदा केली आहे.
उर्वरित 50 टक्के रक्कम म्हणजे 374 कोटी 34 लाख रुपये अद्याप प्राप्त होणे बाकी आहे. त्यामुळे उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ठरलेल्या 31 मे 2022 रोजी च्या निर्णयानुसार बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी या कंपनीला पंधरा दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊनही अद्याप पर्यंत उर्वरित नुकसान भरपाई पोटीची रक्कम जमा केली नाही म्हणून या कंपनीची सिटी बँक पुणे येथील सर्व खाती गोठवण्यात येऊन तसेच नुकसान भरपाई पोटी मिळणे अपेक्षित असणारी 374 कोटी 34 लाख रुपये रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सिटी बँकेने बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीची सर्व खाती गोठवली आहेत.अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे.