खोटे सोने आणि कागदपत्रं दाखवून सोलापुरातील कॅनरा बँकेची तब्बल 86 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कॅनरा बँकेतील अधिकृत सोन्याची तपासणी करणाऱ्या सोनाऱ्यासह 14 जणांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरातील कॅनरा बँकेचा चार शाखांतून गेल्या तीन महिन्यांपासून हा फसवणुकीचा प्रकार चालला असल्याचं समोर आलं आहे. कॅनरा बँकेच्या 4 शाखेतून 2255 ग्रॅम सोने बनावट सोने तारण ठेवून, खोटी कागदपत्रं दाखवून 85 लाख 93 हजार रुपयांची रक्कम उचलून फसवणूक केल्याचं उघडकीस आलं. कॅनरा बँकेची चीफ मॅनेजर अनिलकुमार शहापूरवाड यांनी जोडभावी पेठ पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली आहे.
बँकेतील सोनारासह संगणमत करून 13 बनावट खातेदारांनी ही खोटी कागदपत्रं सादर केली होती. सोनार सुनील वेदपाठक याच्यासह खातेदार जावेद वजीर सय्यद, हुसेन पापा शेख, युवराज शिवराम ढेरे, कार्तिक सारसंभी, जुबेर जहागीर मुल्ला, भुजंग सुनिल शेळके, जयवंत पुंडलिक ढेकळे, जैनोद्दीन शेख, सोमनाथ मधूकर शेळके, सरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादीर मलिक पठाण, उत्तरेश्वर मल्लीकार्जुन बोबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.