मुलीचा मान व जावयाला वाण अशा या धोंड्याच्या महिन्याला आता आधुनिक झालर मिळाली असली तरी नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपारिक पध्दतीने मराठमोळया थाटात हे पर्व साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी थेट सहा बैलगाड्या गावातून मागवल्या असून त्याची सजावट करुन जावई व मुलीची त्यावरुन मिरवणूक काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी लेझिम पथक, हलगी, टाळ – मृंदुगाचा गजरही व्हावा यासाठी कलाकारांना निमंत्रीत केले आहे. १३ ऑगस्ट रोजी रवी शंकर मार्गावरील शुभ भाग्य या बंगल्या जवळ सकाळी ९ वाजेपासून हा सोहळा रंगणार आहे.
या हटके सोहळ्यात मुली व जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही देण्यात आला आहे. जावई धोतर, कुर्ता व टोपी परिधान करणार आहे. तर मुलगी ही नववारीचा शृंगार करणार आहे. यावेळी या दोघांचे स्वागतही वेगळ्या पध्दतीने केले जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी व फुलांची सजवाट केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्यात भविष्य सांगणारा लक्षवेधी असणार आहे तर मेंहदीचा सोहळाही येथे रंगणार आहे. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, १३ बहिणी व सर्व जावई येणार आहे.
या हटके सोहळ्याबाबत बोलतांना गौतम कांतीलाला हिरण यांनी सांगितले की, आपली भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. नवीन पिढीला ती समजावी यासाठी थोडं वेगळ करण्याचा निर्णय घेतला. खरं तर ३३ महिन्यांनंतर अधिकचा महिना येत असतो. यावेळी मुलीचा मान व जावयाला वाण दिले जाते. त्यामुळे हा सोहळा आम्ही वेगळ्या पध्दतीने साजरा करणार आहोत…
जेवणही पुरणपोळीचे
या सोहळ्यात जेवण हे पुरणपोळीचे असणार आहे. पण, ते थोड्या वेगळ्या पध्दतीने व पारंपारिक पध्दतीने आम्ही करणार आहोत. या जेवणावळीत अनेक पदार्थ आम्ही ठेवले आहे. ते स्वादिष्ट असेलच पण त्याची चव जिभेवर तरंगत रहावी अशी असणार आहे.
अधिक मास म्हणजे काय?
अधिकमास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा नजरेसमोर येते. याला ”धोंडा” असेही म्हणतात. हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते, परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे.