बार्शी – बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी बार्शीत शांततेत मतदान झाले. ३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदान संपल्यानंतर ९६.९८ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांनी सांगितले.
आज सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून आदित्य कृष्णा मंगल कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. सुलाखे हायस्कूलसह नवीन मराठी शाळा आणि वैराग येथेही मतदान केंद्रात सहकारी संस्था, ग्रामपंचायत, आणि हमाल तोलार मतदार संघासाठी चुरशीने मतदान झाले. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सहकारी संस्था मतदार संघात १ हजार ६३३, मतदारांनी (९९. २७ टक्के), ग्रामपंचायत मतदार संघात १ हजार २७ (९८. ८५ टक्के) तर हमाल तोलार मतदार संघात ९३७ मतदारांनी (९१. ४१ टक्के) हक्क बजावला. एकूण ३ हजार ७०९ मतदारांपैकी ३ हजार ५९७ (९६. ९८ टक्के) मतदान झाल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिस सय्यद यांनी सांगितले. मतदान केंद्राबाहेर दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती आणि घोषणाबाजी ही केली.

























