कासाळगंगा नदी प्रदुषण मुक्त करून नदी बारमाही वाहती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तात्काळ पूर्ण करावीत. कासाळगंगा नदीचा परिसर प्लास्टिक मुक्त करा. स्वच्छ पर्यावरणासाठी नदीला जाणून घ्या, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
कासाळगंगा नदी लोक अभ्यास व कृती अहवाल अंतर्गत आज नियोजन बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे मार्गदर्शन करत होत्या. जलतज्ञ राजेंद्र सिंह हे स्वीडन वरून ऑनलाईन द्वारे बैठकीस उपस्थित होते. तसेच उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, यशदाचे निवृत्त संचालक सुमंत पांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, सिने अभिनेते व ब्रॅन्ड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर व ऋतुजा बागवे व्हीसी द्वारे तर चला जाणूया नदी उपक्रमांचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेंद्र महाजन, श्रीधर कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे बैठकीस उपस्थित होते.
प्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे म्हणाल्या की, नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे पुर्ण करा. नदीच्या क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी पंधरावा वित्त आयोग व इतर निधीचे संयोगिकरण करावे. कृती अहवालातील उपाय योजनांच्या कामाचे नियोजन करा. कासाळगंगा नदीचा परिसर प्लास्टिक मुक्त करा. स्वच्छ पर्यावरणासाठी नदीला जाणून घ्या. नदीकाठच्या परिसरात वृक्ष संवर्धन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कासळगंगा प्रकल्प जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी पथदर्शी असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. तर टास्क फोर्सचे अध्यक्ष व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी कासाळगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी वृक्षलागवड रोजगार हमी योजनेतून करावी. तसेच कासाळगंगा नदीचा परिसर वृक्ष लागवड करून परिसरातील ग्रामपंचायती यासाठी योगदान देतील असेही शेळकंदे यांनी सांगितले. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी कासाळगंगा नदीकाठच्या सर्व ग्रामपंचातीनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
जिल्हा परिषदेचे नदीसाठी योगदान कौतुकास्पद – जलतज्ञ राजेंद्र सिंह
सोलापूर जिल्हा परिषदेने नदीसाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा प्रशासन व नागरिक जलसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. ही बाब अत्यंत महत्त्वाची असून यातून या भागात जलक्रांती नक्की घडेल असे त्यांनी सांगितले. यासाठी खुप शुभेच्छा देत असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी स्विडन येथून व्हीसी द्वारे बोलताना व्यक्त केले.
प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत शपथ –
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ओडिएफ प्लस ला चालना देण्यासाठी व प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत सर्वांना शपथ देण्यात आली.