निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक केल्या प्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली. अटक झाल्यावर तुरुंगात त्यांचे कैद्यासारखे फोटो देखील काढण्यात आले. त्यानंतर अवघ्या वीस मिनिटांतच त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. सुटका झाल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी काही चुकीचे केलेले नाही.
ट्रम्प यांच्यावर जॉर्जिया येथे निवडणूक निकाल बदलण्यासाठी फसवणूक, धमकी देणे आणि बनावटगिरी केल्याचा आरोप आहे. त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी १८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. तसेच ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी दखील आत्मसमर्पण केले आहे. १५ ऑगस्ट रोजी अटलांटा कोर्टाने आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात समाविष्ट ४१ आरोपांपैकी १३ आरोपांमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
२०२० मध्ये झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्रात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने जाणीवपूर्वक निवडणूकांचे निकाल स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात २०२० सालच्या युएस निवडणुकीचे निकाल बिघडवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांची चौकशी करणाऱ्या विशेष वकिलाने ४५ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणी अंती त्यांना २५ ऑगस्टपर्यंत सरेंडर करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच ते पोलिसांसमोर हजर झाले. ट्रम्प यांच्यावर पाच महिन्यांत चार क्रिमिनल केस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सोबतच व्हाइट हाऊसचे माजी चीफ ऑफ स्टाफ आणि नेते रुडॉल्फ गिउलियानी यांच्यावर देखील केस दाखल करण्यात आली आहे.
अटक झाल्यानंतर ट्रम्प यांना एका खोलीत नेण्यात आले. तेथे त्यांचे फिंगरप्रिंट घेण्यात आले. त्यानंतर त्यांच मग शॉट (चेहऱ्याचा फोटो) देखील घेण्यात आला. हे डॉक्युमेंट्स कोर्ट आणि पोलिस रेकॉर्ड्सचा भाग बनतील. तसेच ट्रम्प यांना फुल्टन काउंटी येथे तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांचा कैदी नंबर P01135809 होता. ट्रम्प यांना या वर्षात चौथ्यांदा अटक करण्यात आली. दरम्यान या अटकेनंतर जॉर्जियामधील फुल्टन काउंटी तुरुंगाने ट्रम्प यांचा एक मग शॉट रिलीज केला आहे.