चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेतील शिपाई हनुमंत काळे यांनी 10 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. मागील 13 वर्षापासून चुकीचा शालार्थ आयडी दिल्याने पगार मिळत नाही, म्हणून शेततळ्यात उडी मारून आपले जीवन संपवले. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन मयताची पत्नी सुनीता हनुमंत काळे यांना तात्काळ अनुकंपा तत्वावर त्याच शाळेत शिपाई सेवक पदावर भरतीचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 23 ऑगस्ट रोजी सुनीता काळे यांचा समावेश शालार्थ प्रणालीमध्ये करण्यास मान्यता दिली आहे.
या आदेशानूसार मयत हनुमंत काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे ह्या अनुकंपा भरतीनुसार चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेत शिपाई सेवक म्हणून प्रति महा 8 हजार रूपये मानधनावर कार्यरत राहतील. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालार्थ प्रणाली मध्ये समावेश करण्याबाबत दिलेल्या मान्यते नंतर उर्वरित माहिती संबंधित शाळेने भरून अधिक्षक , वेतन पथक (माध्यमिक) सोलापूर यांच्या लॉग इन ला पाठवून मान्य करून घेण्याचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी आदेशित केले आहे.