संगम पुलाजवळ असलेल्या रेल्वेच्या जागेत ‘लोकल’साठी टर्मिनल बांधण्यात येणार आहे.‘एमआरव्हीसी’ (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) ने यासाठी जागा निश्चित केली आहे. नुकतेच पुणे स्थानकाच्या यार्डमध्ये ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यात आले. पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम करीत असताना लोकलसाठी नवीन टर्मिनल बांधले जाणार असल्याची माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी एकूण खर्च ५ हजार २०० कोटी रुपये आहे.
‘एमआरव्हीसी’ने ४ जुलैला पुणे-लोणावळा दरम्यान प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा सुधारित अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे. मात्र, हे काम ‘एमआरव्हीसी’च करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने कामांना सुरूवात झाली आहे. तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी ५ हजार १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.