वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दर सर्व सामान्यांच्या खिशाला परवडत नसल्याने वातानुकुलित वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून पहिली नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये नॉन -एसी वंदे भारतची बांधणी सुरू आहे. दरम्यान वेगावान, आरामदायी आणि अगदी वाजवी दरात प्रवाशांना प्रवास करता यावे. यासाठी पहिल्या टप्यात प्रायोगिक तत्वावर ऑक्टोंबर अखेर दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
वातानुकुलित वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना थोडी वेगळी असणार आहे. पण यामध्ये आरामदायी प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा असतील. तर या गाडीत टॉयलेट व्यवस्था देखील वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहेत. एका डब्यातून दुसर्या डब्यात मुक्तपणे प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील असणार आहे. यामध्ये स्लिपर कोचची देखील सुविधा देण्यात येणार आहे.