ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भारतरत्न तथा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केले. दरम्यान काही वेळातच पोलिसांनी बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
गणेश मंडळ मंडपांबाहेर ‘सचिन तेंडुलकर दानपेटी’ ठेवणार!
दरम्यान, बच्चू कडूंनी आपल्या मागणीसाठी सर्व गणेश मंडळांच्या मंडपांबाहेर ‘सचिन तेंडुलकर दानपेटी’ ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सचिन तेंडुलकर यांचे खूप चाहते आहेत. असे असताना त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यामुळे त्याचे परिणाम जनमानसावर पडत आहेत. कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. सचिन यांनी जाहिरात सोडावी किंवा भारतरत्न तरी परत करावं. त्यांना भारतरत्न नसतं, तर आम्ही काही बोललो नसतो. पण ते देशाचे भारतरत्न आहेत. त्यांनी जर ही जाहिरात सोडली नाही, तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. तसेच गणपतीलाही प्रार्थना करणार आहोत की, सचिन तेंडुलकर यांना चांगली बुद्धी द्यावी. दानपेटीत जमा होणारा सर्व पैसा गणेश विसर्जनाच्या दिवशी सचिनला आणून दिला जाईल. पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे, हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
भारतरत्न जुगाररत्न होऊ नये!
या जाहिराती करणारे इतर सेलिब्रिटी हे भारतरत्न नाहीत. भारतरत्न भगतसिंग यांना मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. फक्त सचिन तेंडुलकर हा आमचा विषय नाही. भारतरत्न हा आमचा विषय आहे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये. आम्ही वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे, असंही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
सचिन तेंडुलरकने काही दिवसांपूर्वी एका ऑनलाईन गेमची जाहिरात केली होती. या जाहिरातीवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला होता. या जाहिरातीमध्ये अप्रत्यक्षपणे जुगाराचे समर्थन करण्यात आल्याचे मत कडू यांचे आहे. त्यामुळे सचिन यांनी अशा प्रकारच्या जाहिराती करू नये आणि माफी मागावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही भाष्य केले होते. पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध क्रिकेटपटू असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. तेव्हा या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातली जनता बळी पडत असून अनेकांचं कौटुंबिक आयुष्य देखील उद्ध्वस्त होत आहे.
सचिनने ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा कडू यांनी आधीच दिला होता. तसेच भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली होती. यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत त्यांनी दिली होती. मात्र, तोपर्यंत सचिनकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.