प्रमुख रहदारीच्या ठिकाणी सिमेंट बल्कर ट्रक पलटी होऊन घडलेल्या अपघातात त्याखाली चेंगरून चार-पाच शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज(आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर बस स्टॉपवर आज दुपारी घडलीय. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. मृताच्या कुटुंबीयांचा आणि महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या सिमेंट ब्लकर ट्रकला उचलण्यासाठी चार-पाच क्रेनची मदत घ्यावी, लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की,औज(आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर बस स्टॉपवर सिमेंट भरून चाललेला बल्कर ट्रक पलटी झाला. त्या खाली शालेय ४-५ मुले चेंगरल्याची भिती व्यक्त होऊ लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांना समजावून पुढील मदत करण्यास सुरुवात करण्याची प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांचा रोष अनावर लागल्याचे दिसताच, त्यांच्यावरील गुन्हे दाखल करण्याची तंबी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
जि.प.शाळेनजीकच्या बस स्टॉपवर सिमेंट बल्कर ट्रक पलटी –
होऊन झालेल्या अपघातात एक चिमुकलीने घटनास्थळी अखेरचा श्वास घेतल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात होते, तर त्या बल्कर खाली बस स्टापवर बसलेले ४ जण अडकल्याची भितीही व्यक्त करण्यात येत होती. सिमेंट बल्कर खूप लोडेड असल्याने गाडी हटवण्यास प्रारंभी अडथळे आले. त्यात ग्रामस्थांचा अनावर संताप लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. ४-५ क्रेनच्या सहाय्याने गाडी हटवण्याचे काम सुरू झाल्यावर ते काही वेळात पूर्ण झाले.त्या बल्कर खाली एका चिमुकलीसह ४ जण चिरडून जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. संतापलेले ग्रामस्थ फोटो-व्हिडिओ घेण्यास विरोध करीत होते. ग्रामस्थ-पोलीस सगळेच आक्रमक दिसत होते. ते फोटो व्हिडीओ कोणीही काढू देत नसल्याचे,घटनास्थळी उपस्थित असलेले माध्यम प्रतिनिधी आपसात बोलत होते.
जय हिंद शुगरमधील एक क्रेन,झुआरी सिमेंटमधील एक क्रेन आणि सोलापुरातील तीन क्रेन –
मागवून बल्कर काढण्यात आले आहे.ज्यात ४० टनापेक्षा अधिक वजन होते, अशी प्राथमिक माहिती आहे. प्रारंभी क्रेनद्वारे मदत कार्य करताना अडचण आली. पाच क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बल्कर बाजूला काढण्यात यश आले. या दुर्घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे म्हटले जात असून एका चिमुकलीसह दोघांची ओळख पटली असून अन्य दोघे परगावचे असल्याचे सांगण्यात आले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज आहेरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील बस स्टॉप वर सिमेंट वाहतूक करणारा बलगर अचानक पलटी झाला –
त्याखाली चेंग्रून औज गावातील विठ्ठल शिंगाडे (वय वर्षे ६०), शालेय विद्यार्थी प्रज्ञा दोडतले (वय वर्षे १२), महेश इंगळे अंदाजे वय वर्षे १६,अनिल चौधरी (वय वर्षे ५०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला असून सिमेंटच्या वाहनांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट वाहतूक करण्यासाठी आरटीओ परवानगी कसा देतो? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आपल्या यंत्रणेला तात्काळ घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सूचना केल्या आहेत.