जून ते ४ सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील जवळपास ७१ महसूल मंडळात खूपच कमी दिवस पाऊस पडला आहे. आता दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली आहे, पण अजूनही सर्वत्र समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याची वारंवार केली जात आहे. परंतु, २००१च्या शासन निर्णयानुसार धरणातील जिवंत पाणीसाठा ३३ टक्के झाल्याशिवाय शेतीला पाणी सोडता येत नाही. सध्या धरण १७.२१ टक्क्यांवर असल्याने फक्त पिण्याच्याच पाण्याला प्राधान्य दिले जात आहे.
उजनी धरणात एकूण १०० टीएमसीपर्यंत पाणी मावते. त्यात ६४ टीएमसी मृतसाठा तर ५६ टीएमसी उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा आहे. सध्या धरणात एकूण ७२.९२ टीएमसी पाणी असून त्यात जिवंतसाठा केवळ सव्वानऊ टीएमसीच आहे. अजूनही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान खात्याचे अंदाज यंदाच्या पावसाळ्यात बहुतेकवेळा चुकल्याने यंदा दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
या पार्श्वभूमीवर धरणात साठलेले पाणी सोडून देणे भविष्यासाठी धोक्याचे ठरू शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे तुर्तास धरणातील पाणीसाठा ३३ टक्के होण्याची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. सोलापूर शहरासाठी उजनीतून १५ तारखेला पाणी सोडले जाणार आहे. सध्याच्या पावसामुळे धरण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यावर कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार गरजेच्या ठिकाणी शेतीला पाणी सोडता येईल, असेही अधिकारी सांगत आहेत.