स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) संचालक अरूणकुमार सिन्हा यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. गुरूग्राममधील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते १९८७ च्या केरळ केडरचे अधिकारी होते.
भारतात पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असते. पंतप्रधान जगात कुठेही गेले तरी त्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी एसपीजींवरच असते. त्यांना अलीकडेच मुदतवाढ देण्यात आली होती. जी-20 परिषदेला अवघे चार दिवस शिल्लक असताना सिन्हा यांचे निधन झाले आहे.
२०१६ पासून अरूण कुमार सिन्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक म्हणून काम पाहत होते. दरम्यान ४ सप्टेंबरला मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिन्हा यांनी झारखंड येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. केरळ पोलिसात त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले होते. डीसीपी, आयुक्त, रेंज आयजी, इंटेलिजेंस आयजी आणि ॲडमिनिस्ट्रेशन आयजी यासारख्या पदावर ते कार्यरत होते.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर १९८८ मध्ये संसदेत एसपीजी ॲक्ट आणण्यात आला आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.