शेतकरी वाढीव नुकसान भरपाईसाठी आत्महत्या करीत असल्याचे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे वस्त्रोद्योग व कृषी व्यापर मंत्री शिवानंद पाटील यांनी केलेय. त्यावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय.
काँग्रेस नेते शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी असे बेलगाम उद्गार काढण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2015 मध्ये देखील कर्नाटकात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढविल्यानंतर त्यांनी अशाच आशयाचे उद्गार काढले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी ते नेहमीच असंवेदनशील बोलतात. यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांवरच आत्महत्येचा ठपका ठेवला आहे. कर्नाटकात सरकारने वारंवार शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये भरच पडली. वाढीव नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करत असतात, असे उद्गार शिवानंद पाटलांनी पुन्हा एकदा काढले आहेत.
बेताल वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्याचे लक्षात येताच शिवानंद यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेय. आपल्या खुलाशात ते म्हणाले की, आपण शेतकऱ्यांना दुषणे देत नाही. परंतु, प्रसिद्धी माध्यमे नेहमीच पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर वरून शेतकरी आत्महत्येच्या बातम्या देतात. त्यांनी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येईपर्यंत थांबायला हवे. कारण त्यातूनच शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळेल. बहुतांश शेतकरी हृदयविकार किंवा अन्य वैद्यकीय कारणांनी मरतात असा अजब खुलासा शिवानंद पाटलांनी केला आहे.