नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर करंजाळी गावाजवळ बस आणि कारच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच, तर दोघांचा सिव्हिल रुग्णालयात आणताना मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे.
करंजाळी गावाजवळील वळणावर पेठ आगाराची पेठ-पुणे बस (एमएच ४० वाय ५९७४) व नाशिकहून गुजरातकडे जाणारी सनी कार (जीजे ०६ एफसी ३३३१) यांची दुपारी साडेतीनच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. कारमधील प्रवासी सुरत येथील असल्याचे कळते. कारमध्ये चार जण होते. यातील दोघांचा अपघात झाल्यानंतर जागीच मृत्यू झाला, तर जखमी दोघांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. मृत प्रवाशांची ओळख पटू शकलेली नाही. जिल्हा पोलिस गुजरात पोलिसांशी संपर्क साधून काही माहिती मिळतेय का, याबाबत माहिती घेत असल्याचे समजले.