शेती हा केवळ उत्पन्न मिळवणारा उद्योग नाही, तर समृद्धी देणारा व्यवसाय आहे. या जाणीवेने शेतीमध्ये सेंद्रिय उत्पादने, विषमुक्त शेती, पशुपालन, रेशीम कोश निर्मितीसारखे अनेक प्रयोग करणारे निमगाव (ता. माळशिरस) येथील जगन्नाथ मगर यांची यशकथा जी-२० शिखर परिषदेत सादर केली जाणार आहे.जगन्नाथ मगर यांची निमगावात १५ एकर शेती आहे. त्यांनी शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मूलभूत प्रयत्न केले.
सुरवातीपासून त्यांनी शेतात रासायनिक खते व कीटकनाशक बंद केले. त्यानंतर गोपालन करत गाईचे शेण व गोमुत्राचा वापर करत जमिनीच्या सुपीकतेसाठी अनेक वर्ष केलेल्या प्रयत्नाने जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला.
जैविक घटकांमुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे पाणी वापरात लक्षणीय काटकसर करता आली. त्यांनी गाईसोबत मेंढ्या, शेळ्या व म्हशीचे पालन केले. त्यातून त्यांनी वर्षभर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून घेतले.