विरोधी पक्षांच्या ‘आयएनडीआयए’ आघाडीची ऑक्टोबर महिन्यात भोपाळ येथे आयोजित सभा रद्द करण्यात आलीय. मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी (16 सप्टेंबर रोजी) ही माहिती दिली.
मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, जाहीर सभा रद्द करण्यात आलेली आहे. आता सभा होणार नाही. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला या विषयावर बोलताना म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठांनी अद्याप भोपाळमधील जाहीर सभेबाबत निर्णय घेतलेला नाही. ज्यावेळी आमचा निर्णय होईल, तेव्हा माध्यमांना याबाबत कळवले जाईल, असेही सुरजेवाला म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक संपन्न झाली होती.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे इंडिया आघाडीची पहिली संयुक्त जाहीर सभा घेण्याचे आघाडीचे ठरविले होते. कमलनाथ यांनी इंडिया आघाडीची जाहीर सभा पुढे ढकलल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावर निशाणा साधत सांगितले की, द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्मावरून केलेल्या टीकेमुळे जनतेचा आक्रोशाला घाबरून इंडिया आघाडीने आपली सभा रद्द केली. सनातन धर्मावरील टीकेमुळे मध्यप्रदेशच्या जनतेला राग आणि तीव्र दुःख वाटत आहे. हा राग त्या जाहीर सभेत व्यक्त होऊ शकतो, याची खात्री पटल्यामुळेच इंडिया आघाडीने आपली सभा रद्द केली असावी, असा दावा शिवराज चौहान यांनी केला आहे.