शोध घेऊनही जागा मिळत नाही, जागेच्या हस्तांतराची डोकेदुखी कायम असल्याने जिल्ह्यातील एकूण ४ हजार ७६ पैकी तब्बल १ हजार ३३० अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही. अंगणवाड्यांना हक्काची इमारत नसल्याने भाडोत्री जागेत, ग्रामपंचायत कार्यालयात अंगणवाड्या भरवल्या जात आहेत. तब्बल १ हजार ५७६ ठिकाणी शौचालय, २ हजार १३४ ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्याची माहिती समोर आली आहे.
महिला व बालकल्याण विभागाने जानेवारी ते जुलै २०२३ दरम्यानच्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांचे अतिसूक्ष्म सर्वेक्षण केले आहे. स्वत:च्या इमारत, स्वच्छतागृह, नळ जोडणी, वीज जोडणी यासह अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसह बालकांचे जन्मदर, कुपोषण याबाबतची अतिसूक्ष्म माहिती संकलित करण्यात आली आहे. सर्वेक्षणामध्ये १ हजार ३३० ठिकाणी स्वतंत्र इमारत नाही. ११०० ठिकाणी इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे एक हजार अंगणवाडीच्या इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, काही ठिकाणी निधीही अपुरा असल्याने बांधकामे रखडली आहेत. जिल्ह्यात बऱ्याच वर्षांपासून या अंगणवाड्यांना इमारती नाहीत. जिल्हा परिषदेकडून याबाबत पाठपुरावा केला जात असला तरी फारसा उपयोग झालेला नाही. अंगणवाडी इमारत बांधकामासाठी पूर्वी सहा लाख रुपये निधी मिळत होता. आता या निधीत वाढ झाली आहे. एका अंगणवाडी इमारत बांधकामासाठी साडेआठ लाख रुपये निधी मिळणार आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींना हा निधी मिळणार आहे.