भारतातील गाड्या उत्पादनातील आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने नुकताच एक नवीन विक्रम केला. त्यांच्या नवीन बोलेरो मॅक्स पिक अप रेंज या गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या सोळा महिन्यात या गाडीने १ लाख गाडी निर्मितीचा टप्पा गाठला आहे. मालवाहतूक क्षेत्रातील हा एक विक्रमच आहे.
१० ऑगस्ट २०२२ रोजी महिंद्राने मॅक्स पिक अप सिटी ही गाडी आणली. मालवाहतुकीसाठी महिन्द्राला मिळणाऱ्या यशात या गाडीचे योगदान मोठे आहे. या गाडीपाठोपाठच कोणतीही कल्पना नसताना, कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये अचानक वेगवेगळ्या मॉडेल्सच्या ८ गाड्या बाजारात आणल्या. वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वजनाचे सामान वाहून नेणाऱ्या या गाड्या सिटी आणि एचडी या रेंजमधील होत्या.
कंपनीच्या या यशाबद्दल महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणतात, एवढ्या कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळणे ही ग्राहकांच्या आमच्यावर असलेल्या विश्वासाची एकप्रकारे पावतीच आहे. भारतातील परिस्थितीची योग्य माहिती असणे आणि त्याप्रमाणेच ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणे, हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. आणि आम्ही ते किती योग्य प्रकारे करतो आहोत, ते आम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादातून समोर येते आहे. यापुढेही आम्ही अशाच प्रकारे ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवू, याची मला खात्री आहे. आगामी येणाऱ्या गाड्या या तांत्रिकदृष्ट्या ऍडव्हान्स असतीलच पण, त्या एकाच वेळी अनेक कामांसाठी वापरता येतील.
ऑल न्यू बोलेरो मॅक्स पिक अप ही गाडी प्रत्येक गोष्टीत इतर गाड्यांपेक्षा सरस ठरली आहे. यात ऍडव्हान्स कनेक्टिव्हिटी फीचर आहेत. या गाड्यांमध्ये ड्रायव्हरचा विचार करून त्याला अधिकाधिक सोयीस्कर कसे वाटेल, याप्रमाणे सीट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दिसण्याची अडचण येऊ नये म्हणून दिव्यांची सोय करण्यात आली आहे. ही गाडी मालवाहतूक करणारी असल्याने सामानाला ऐसपैस जागा मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच 7R16 हे मजबूत टायर या गाडीला असून त्यामुळे कुठेही अडथळा येत नाही. या गाड्यांमध्ये सिटी आणि एचडी या दोन रेंज असून ग्राहकांच्या गरजेप्रमाणे या दोन्ही गाड्या डिझेल तसेच सीएनजी या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत.
ही गाडी बाजारात आल्यापासून आतापर्यंत महिंद्राच्या जवळपास २ लाखांहून अधिक गाड्यांची विक्री झाली आहे. भारतातील परिस्थितीचा अभ्यास करून निर्माण करण्यात आलेल्या या गाड्यांना म्हणूनच मोठ्या प्रमाणात मागणी असते. देशातील अगदी दुर्गम भागात जाण्याची देखील या गाडीची क्षमता आहे, त्यामुळेच या गाड्या आपल्या मालवाहतुकीचा कणा आहेत, असे म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही.