मध्य प्रदेश, राज्यस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला. पण आठवडा होत आला तरी भाजपला या राज्यांसाठी मुख्यमंत्री निवडता आलेले नाहीत.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन निवडणुका भाजपनं जिंकल्या. मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखताना भाजपनं काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या छत्तीसगड आणि राजस्थानात बाजी मारली. पण या तिन्ही राज्यांमध्ये अद्याप भाजपला मुख्यमंत्र्यांची निवड करता आलेली नाही.
निवडणूक निकाल लागलेल्या पाचपैकी दोन राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न झालेला असताना भाजप नेतृत्त्वाला अद्याप तरी मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित करता आलेली नाहीत. तिन्ही राज्यांमध्ये भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नव्हता. भाजपनं पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. निवडणूक निकालाला आठवडा उलटूनही अद्याप भाजपनं मुख्यमंत्री निवडलेले नाहीत. त्यामुळे या राज्यांमध्ये भाजप नवे चेहरे देण्याची शक्यता आहे.
२०१३ मध्ये भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये निवडणूक निकालानंतर अवघ्या ३ दिवसांत मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित केली होती. त्यावेळी भाजपला या राज्यांमध्ये नव्या चेहऱ्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा द्यायची नव्हती. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानात वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह मुख्यमंत्री होणार हे निश्चित होतं.
२०१७ मध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडताना भाजपनं बराच वेळ घेतला. या तिन्ही राज्यांमध्ये नवे चेहरे देण्यात आले. हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रेम कुमार धुमल, अनुराग सिंह ठाकूर, भगतसिंह कोश्यारी, रमेश पोखरियाल निशंक, राजनाथ सिंह, मनोज सिन्हा यांच्यासारखी अनुभवी आणि चर्चेतले चेहरे शर्यतीत होते. पण उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत, हिमाचलमध्ये जयराम ठाकूर आणि उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांची निवड करुन भाजपनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
लोकसभा निवडणुकाला अवघे काही महिने शिल्लक आहेत. भाजप हायकमांड तिन्ही राज्यांमध्ये नेतृत्त्व बदलाच्या तयारीत आहे. जुन्या चेहऱ्यांना संधी द्यायची असती तर भाजप नेतृत्त्वानं इतका वेळ घेतला नसता. यावेळी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. पण अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप तिन्ही राज्यांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची दाट शक्यता आहे.