प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतांना दिसतोय. अनेक दिवसांनंतर असा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘अॅनिमल’ चा धुमाकूळ सुरू आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करत प्रचंड कमाई करत सगळ्यांनाच चकीत केलं आहे. कुणी या चित्रपटाचं कौतुक करतंय तर कुणी या चित्रपटाला ट्रोल करतंय. त्यात विकी कौशल याचा सॅम बहादूर देखील आपली जादू दाखवत आहे. मात्र या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हिंदी चित्रपटांचा गर्दीत मराठी चित्रपट आपलं स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. हेमंत ढोमे याच्या ‘झिम्मा २’ नंतर आणखी एका चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभतो आहे तो म्हणजे प्रसाद खांडेकर याचा ‘येऊन तर बघा’ हा चित्रपट. दोन दिवसातच या चित्रपटाने लाखोंची कमाई करत सगळ्यांना चकीत केलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर लिखित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी या कलाकारांची फौज आहे. ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच ९० लाख ६९ हजारांची कमाई केली आहे. पुढील २ दिवसात हा चित्रपट कोटींचा आकडा पार करेल यात शंकाच नाही. चित्रपटाला पहिल्याच दिवशी मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून निर्मात्यांसह दिग्दर्शक आणि कलाकार भारावून गेले आहेत. प्रत्येकजण चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे.
यापूर्वी आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावर अशा मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल आणि थिएटर उपलब्ध करून दिले जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. आता प्रेक्षकांची वाढती संख्या पाहून थिएटर चालकही शोची संख्या वाढवत आहेत.