मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रेड करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यासाठी मुंबईनं किती ट्रान्सफर फी दिली, त्याचा आकडा समोर आलाआहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सनं त्यांचा माजी खेळाडू हार्दिक पंड्याला संघात घेतलं. त्यासाठी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड करण्यात आला. या निर्णयानं अनेकांना धक्का बसला. पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सला २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकसाठी १५ कोटी रुपये मोजले. याशिवाय मुंबईनं अतिरिक्त ट्रान्सफर फीज भरली. त्याची माहिती केवळ आयपीएलच्या गव्हर्निंग समितीला आहे. मात्र आता या रकमेचा उलगडा झाला आहे.
मुंबई इंडियन्सनं पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केलं. तेव्हा हार्दिकला मिळणारे १५ कोटी रुपये मुंबईच्या पर्समधून वजा झाले. इतकीच रक्कम गुजरातच्या पर्समध्ये जमा झाली. पण पंड्याच्या पगारापेक्षा अधिक रक्कम गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फीज म्हणून मिळाली. मुंबईनं तब्बल १०० कोटी रुपये मोजून हार्दिकला आपल्या ताफ्यात दाखल केल्याचं वृत्त आहे.
हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वात संघानं २०२२ मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावलं. तर २०२३ मध्ये संघ उपविजेता ठरला. गुजरात टायटन्स आतापर्यंत केवळ दोन आयपीएल स्पर्धा खेळला आहे. दोन्ही हंगामात त्यांनी हार्दिकच्या नेतृत्त्वात अंतिम फेरी गाठली. त्यामुळे हार्दिकला सोडणं गुजरातसाठी अवघड निर्णय होता.
मुंबई इंडियन्सकडून १०० कोटी रुपये ट्रान्सफर फीज मिळाल्यानं गुजरात टायटन्सचं व्हॅल्यूएशन १०० कोटी रुपयांनी वाढणार आहे. तर पांड्याला मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार आहे. याच अटीवर तो मुंबईच्या संघात परतला आहे. आयपीएलमध्ये पंड्या सर्वप्रथम मुंबई इंडियन्सकडूनच खेळला. पंड्याचा समावेश असलेल्या मुंबईनं चारवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. आयपीएल २०२२ साठी मुंबईनं त्याला रिटेन केलं नाही. गुजरात टायटन्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं. संघाला पहिल्याच फटक्यात जेतेपद जिंकून देत त्यानं आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली.